Monday, December 28, 2015

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' बंद होणार!


टक्के-टोणपे, चिमटे आणि नर्मविनोदी टोलेबाजीनं भरलेला, प्रेक्षकांच्या रात्री 'कलरफुल'
करणारा कपिल शर्माचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आता लोकांची
रजा घेणार आहे. जुलै २०१३ मध्ये कलर्स वाहिनीवर सुरू झालेल्या या शोचा अखेरचा भाग १७
जानेवारी २०१६ला दाखवण्यात येणार आहे.

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ची हुबेहूब कॉपी असलेला 'कॉमेडी नाइट्स बचाओ' हा कार्यक्रम
सध्या 'कलर्स' वाहिनीवर दाखवण्यात येत आहे. आधीच्या शोमध्ये काम करणारे कृष्णा, सुदेश
आणि भारती हेच कलाकार नव्या कार्यक्रमात आहेत. या घडामोडींमुळं नाराज झालेल्या कपिलनं
कॉमेडी नाइट्समधून अंग काढून घेतलं आहे.

याबाबत बोलताना कपिल शर्मा म्हणाला, 'नव्या शोचं नाव आधी 'रोस्ट' असं ठेवण्यात येणार
असल्याचं सांगितल गेलं होतं. मात्र, नंतर नावाची कॉपी करण्यात आली. केवळं नावच नव्हे, तर
आमच्या शोची हुबेहुब नक्कलही करण्यात आली. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मधील कलाकारच
यात काम करत आहेत. आमच्याच शोमधील सेलिब्रिटी नव्या शोमध्ये दिसतात. आमचा शो प्रचंड
लोकप्रिय आहे. लोकांना त्याची सवय झाली आहे. एकाच वाहिनीवर त्याच-त्याच प्रकारचे शो
असल्यास टीआरपीवर परिणाम होईल, असं मला वाटतं. म्हणूनच आम्ही आमच्या कर्यक्रमाचा
समारोप करणार आहोत.'